रियाध – गेल्या तीन वर्षांपासून कोठडीत असलेल्या सौदी अरेबियाच्या राजकन्येची आज सुटका करण्यात आली. बसमा बिंत सौद बिन अब्दुलअजिज यांच्याबरोबर त्यांच्या कन्येचीही कोठडीतून सुटका करण्यात आली, असे मानवी हक्क विषयक गटाने म्हटले आहे.
राजघराण्यातील सदस्या असलेल्या 57 वर्षीय बसमा यांना कोणत्याही आरोपाविना कोठडीत टाकण्यात आले होते. बसमा या महिलांच्या हक्कांच्या आणि राज्यघटनात्मक राजघराणेशाहीच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांना 2019 च्या मार्च महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 2020 च्या एप्रिल महिन्यात त्यांनी राजे सलमान आणि युवराज मोहंम्मद बिन सलमान यांना प्रकृतीअस्वास्थतेच्या कारणावरून सुटकेची विनंतीही केली होती.
आज राजकन्या बसमा यांच्यासमवेत त्यांची कन्या सुहौंद यांचीही सुटका करण्यात आली आहे.
राजकन्या बसमा यांना असाध्य आजार झाले असतानाही त्यांना वैद्यकीय उपचार नाकारण्यात आले होते. कोठडीत असताना त्यांच्यावर कोणताही आरोप कधीच लावला गेला नव्हता. राजकन्या बसमा यांच्या सुटकेबाबत सौदीच्या कोणत्याच अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.