मुंबई – करोनाच्या पहिला लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणारे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. काही रुपयांमध्ये लोकांना दोन्ही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र या टोळीकडून दिले जात होते. इतकंच नव्हे तर या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी कोविन ऍप वरसुद्धा दिसत होती. या प्रकारामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
तर, धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरणाचे नवे प्ररूप उभे राहिले आहे. अवघ्या एक हजार रुपयांत लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.