पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेल्याने त्यांना परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून संधी देण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय अखेर शुक्रवारी जारी करण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
करोनाकाळात एमपीएससी विद्यार्थ्यांची परीक्षा कळीचा मुद्दा ठरला होता. करोनाकाळात स्थगित झालेली परीक्षा घेण्यासाठी पुणेसह राज्यभरात उमेदवारांनी आंदोलन केले होते. मात्र करोनाचे संकट वाढल्याने परीक्षा स्थगित करण्यात आली होती. या साऱ्या गोंधळात अनेक उमेदवार परीक्षेला मुकले. दोन वर्षे करोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी, अशी मागणी होती.