पुणे – शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवारपासून उत्साहात सुरू झाल्या. जवळपास दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या आनंदाने उत्सुकतेने शाळेत आले होते. शाळेकडूनही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
जूनपासून ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. मात्र, गुरुवारपासून प्रत्यक्षात म्हणजेच ऑफलाइन वर्ग सुरू झाले. शाळेच्या वेळेबाबत पूर्वकल्पना त्यांच्या मोबाइल ग्रुपद्वारे देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी शाळेत आले होते. पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. प्रत्यक्ष मुले वर्गात उपस्थित असल्याने शिक्षकांनाही शिकविण्याचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले. ऑफलाइन वर्ग सुरू झाले असली तरी बहुतांश शाळेत ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने एकाच वेळी शिकविण्यात येत होते. शिक्षकही वर्गात प्रत्यक्ष व ऑनलाइन अशा दुहेरी जबाबदारी पार पडत अध्यापन करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांना अधिक परिश्रम घ्यावे लागत आहे.
हमीपत्र आणि गणवेश सक्ती केल्याने बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण अल्प होते. सर्व विद्यार्थ्यांना ऐनवेळी गणवेश मिळू शकले नाहीत. विद्यार्थ्यांना ने-आण करणे काही पालकांना शक्य नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. तसेच “ओमायक्रॉन’ या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही पालकांनी तूर्तास ऑनलाइन वर्गाला पसंती दिली आहे. येत्या सोमवारपासून वर्गातील विद्यार्थी वाढतील, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर सोबत बाळगून करोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले.
रांगोळ्या, फुग्यांची कमान, फुलांच्या पायघड्या
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत रांगोळ्या, फुग्यांची कमान, फुलांच्या पायघड्या, बालगीते यांनी वातावरण प्रसन्न होते. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी विद्यार्थ्यांना औक्षण केले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर इत्यादी आवश्यक गोष्टी व खाऊवाटप केले. ऑक्सीजन मीटर,टेम्परेचर गन इत्यादी सर्व बाबींची काळजी घेण्यात आली होती. सोनाली मुंढे यांनी सूत्रसंचालन केले. शाळा भरताना व सुटताना विद्यार्थ्यांना ओळीने व्यवस्थित ठरलेल्या वेगवेगळ्या गेटमधून आत घेणे, बाहेर सोडणे ही व्यवस्था करण्यात आली होती.