मुंबई – करोनाचा नवा व्हेरीएंट ओमायक्रॉन फैलावत असल्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जोरदार विक्री होऊन निर्देशांक कमी पातळीवर गेले होते. मात्र ओमायक्रॉन अल्फाइतका मनुष्यहानी करणारा नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून येत असल्यामुळे भारतासह जागतिक शेअर बाजारात आशादायक वातावरण निर्माण झाले.
काही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात निवडक खरेदी केल्यामुळे मंगळवारी शेअर बाजाराचे निर्देशांक दीड टक्क्यांपर्यंत उंचावले मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 886 अंकांनी वाढून 57,633 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1.2 टक्क्यांनी म्हणजे 264 अंकांनी वाढून 17,176 अंकांवर बंद झाला.टाटा स्टील, ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक, स्टेट बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांनी आज तेजीचे नेतृत्व केले. तर एशियन पेंट्स कंपनीला विक्रीचा मारा सहन करावा लागला. दरम्यान काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,361 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.
आशावादाचे कारण
ओमायक्रॉनची संसर्गक्षमता जास्त असली तरी मनुष्यहानी करण्याची क्षमता कमी असल्याचे जगभरातील प्रयोगशाळात प्राथमिक चौकशीत आढळून येत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा जागतिक व्यापारावर आणि उद्योगावर डेल्टा इतका परिणाम होणार नाही असे समजले जात आहे. त्यामुळे सकाळी अमेरिका, युरोप व आशियाई शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी केली.
मवाळ पतधोरणाचे संकेत
रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण उद्या जाहीर होणार आहे. गेल्या पंधरवड्यात विविध राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वाहतुकीवरील परिणामामुळे शेतीबरोबरच उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच ओमायक्रोनमुळे काही काळ परिस्थिती संदिग्ध राहण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत रिझर्व्ह बॅंकेला व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आग्रह होत आहे. याकडे बॅंक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
शेअरच्या किमती कमी
गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार विक्रीमुळे सध्या निर्देशांक कमी पातळीवर आहेत. शेअरच्या किमती तुलनेने कमी आहेत. त्यामुळे दीर्घ पल्ल्याचा विचार करणारे गुंतवणूकदार सध्याच्या कमी किमतीच्या शेअरची निवडक खरेदी करीत आहेत.
विविध क्षेत्रातील उत्पादकतेत वाढ
दुसऱ्या तिमाहीतील विकास दर 8.4 टक्के नोंदला गेला आहे. त्यातच अर्थव्यवस्थेच्या 22 क्षेत्रापैकी 19 क्षेत्रातील उत्पादकता करोनापूर्व पातळीवर आली आहे. त्यामध्ये ई- वे बिल, व्यापारी निर्यात, कोळसा उत्पादन, रेल्वे मालवाहतूक इत्यादीचा समावेश आहे.
तेजी -मंदीचा अंदाज
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे विश्लेषक चंदन तापडिया म्हणाले की दुसऱ्या सत्रात निफ्टी 260 अंकांनी वाढला. त्यामुळे आगामी काळात सकारात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जर खरेदी वाढली तर निफ्टी प्रथम 17,200 ची पातळी गाठेल व परिस्थिती अधिकच चांगली राहिली तर निफ्टीसाठी पुढचे टप्पे 17,350 व 17,500 असे आहेत. मात्र अनपेक्षित घटनाक्रमामुळे विक्रीचा जोर वाढला तर निफ्टीसाठी 17,000 अंकावर चांगला आधार आहे.