ऍम्स्टरडॅम – करोना संसर्गितांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागल्याने नेदरलॅंडमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले. त्याच्या विरोधात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागून दंगल उसळली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला त्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेले दोन वर्ष करोना निर्बंधांमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांचा हा उद्रेक असल्याचे मानण्यात येत आहे.
काही आंदोलनकर्त्यांनी दुकानांची तोडफोड सुरू केली. त्यांनी दगडफेक सुरू करत पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला.
दोन दंगलखोरांना गोळी लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना लागलेली गोळी पोलिसांच्या गोळीबारात लागली की अन्य कोणी गोळी झाडली याचा तपास पोलीस करत आहेत. सुमारे 50 दंगलखोरांना अटक केली असून त्यात निम्मे जण अल्पवयीन आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याला शनिवारी दुपारी दंगलीत जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी उपचार केले. अनेक पालीस या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकावर कारवाई सुरू केली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकसुरू केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. व्हिडीओ फुटेजच्या सहाय्याने दंगलखोर आरोपींचा शोध सुरू आहे
हिंसाचार घडला त्या रोटरडॅम शहराचे महापौर अहमद अबौतालेब यांनी या हिंसाचाराचा निषेध केलाय. ते म्हणाले, शनिवारी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचा वापर केलाय. आंदोलकांनी मॉलची नासधुस केली. शहरात तोडफोड करत पोलिसांवरही हल्ले केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. जखमींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
हसक आंदोलकांनी पोलिसांची मोटारही पेटवली तसेच अन्य एका पोलीसंच्या वाहनाची नासधूस केली. मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.