कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ (ता. भोर) येथे म्हैसान जातीच्या दोन म्हशी आणि एक पारडी असे पशुधन चोरीस गेले असून चोरांची “नजर’ आता शेतकऱ्यांच्या पशुधनावर वळली असल्याचे या घटनेने स्पष्ट होत आहे. याबाबत किकवी पोलीस चौकीत रविवारी (दि. 7) अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी सुदाम नानाजी गाडे (वय 54, रा. कापूरहोळ) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी शेती व दूध व्यवसायातून त्याचा चरितार्थ चालवतात. त्यांच्याकडे बारा म्हैसान दिल्ली जातीच्या म्हशी आहेत. शनिवारी (दि. 6) शेतातील गोठ्यात रात्री जनावरांना चारापाणी करून साडेनऊ वाजता सुदाम गाडे घरी आले. रविवारी पहाटे पावणेसहा वाजता गोठ्यात गेल्यावर त्यांना काळ्या रंगाच्या दोन म्हशी व एक पारडी जागेवर दिसले नाहीत.
गोठ्याची लोखंडी जाळी व दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. दरम्यान म्हशींचा आजूबाजूला तपास केला, तसेच पुणे येथे जनावरांच्या बाजारातही पाहणी केली. मात्र, तेथेही त्या आढळल्या नाहीत. त्यांची चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. या म्हशींची बाजारातील किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचे गाडे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे पुढील तपास करीत आहेत.