मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शिवसेनेच्या दसऱा मेळाव्यापासून जोरदार टीका टीप्पणी सुरू आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी झाली. त्यानंतर यात भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावर आता राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेलाची बाटली पाठवली होती. आता या तेलाच्या बाटलीचीच चर्चा राजकारणात सुरू आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.
कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद मिळाल्यावरही एखादी विकृत व्यक्ती जर बडबडत असेल तर नक्कीच समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळ आली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ट्विट करत अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.
कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद मिळाल्यारही एखादी विकृत व्यक्ती जर बडबडत असेल तर नक्कीच समजुन जावे नवरत्न तेलाने चंपी करण्याची हिच ती वेळ.#टोपीखालचे संस्कार
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 17, 2021
अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये ‘टोपीखालचे संस्कार’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे.