काबूल – अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्याची माघारी पूर्ण झाल्यानंतर अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर कित्येक दशकानंतर शस्त्रांचा बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे. कोणत्याही शस्त्राची ऑर्डर दिल्यावर काही वेळातच या शस्त्राची डिलिव्हरी केली जात आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेल्या 2600 किलोमीटर लांबीच्या सीमेवर दोन्ही बाजूंनी शस्त्रांची ही खरेदी विक्री गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुळातच या सीमेवर कोणताही कायदा नव्हता. या भागातील घुसखोर आणि दहशतवादी ठरवतील तोच कायदा येथे होता. त्यामुळे पुन्हा एकदा येथे शस्त्रांचा बाजार तेजीत आला आहे. या बाजारपेठेत अत्याधुनिक अशी चायनीज शस्त्रे मिळतातच शिवाय आसपासच्या कारखान्यांमध्ये तयार केलेली देशी हत्यारही सहज उपलब्ध होतात.
2001 मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपले लष्कर आणले तेव्हा या बाजाराचे नाव बुश बाजार असे ठेवण्यात आले होते. पण आता मात्र हा बाजार जहांगीर बाजार म्हणून ओळखला जातो. व्हिडिओ कॉलच्या साह्याने शस्त्रांचे बुकिंग केले जाते आणि कधी डिलिव्हरी केली जाईल हे सांगितले जाते.
एकेकाळी या बुश बाजारामध्ये रशियन शस्त्रांना मोठी मागणी होती पण आता रशियन शस्त्र उपलब्ध होत नसल्याने चायनीज आणि अमेरिकन शस्त्रांबरोबर स्थानिक पातळीवर तयार केलेली शस्त्रही या बाजारात विकली जातात. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा अमेरिकेचे लष्कर होते तेव्हा या लष्कराला वापरण्यासाठी जी शस्त्रे लागत होती ती पाकिस्तान मधील कराची बंदरावर येत असत. तेथून ती रस्तामार्गे अफगाणिस्तानात पाठवली जात असत.
अनेक वेळा घुसखोरांनी आणि दहशतवाद्यांनी शस्त्रे घेऊन जाणारी वाहने लुटली होती आणि ती शस्त्रे नंतर या बुश बाजारात विकण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची आता वाहतूक कमी झाल्याने स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या शस्त्रांप्रमाणेच कुठेही उपलब्ध होतील अशी शस्त्रे आणि हत्यारे या बाजारात विकली जातात.