पॅरिस – फ्रान्समध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये कॅथोलिक चर्चकडून तब्बल 3 लाख 30 हजार बालकांचे लैंगिक शोषण झाले असल्याची माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात फ्रान्स सरकारने नियुक्त केलेल्या एका आयोगाच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
जीन मार्क सुव्ह हे या आयोगाचे अध्यक्ष होते. धर्मगुरू, तसेच चर्चमधील कर्मचारी आणि धार्मिक व्यवहारांशी संबंध नसलेल्या व्यक्तींकडून या बालकांचे लैंगिक शोषण करण्यात आले असा प्राथमिक अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. शोषण झालेल्या बालकांमध्ये 80 टक्के मुलगे असल्याची धक्कादायक माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.
लैंगिक शोषणाच्या या प्रकरणांमधील 3 हजार प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष धर्मगुरूच सहभागी आहेत. धर्मगुरु आणि चर्चशी संबंधित क्लार्कसारख्या व्यक्तींकडून 2,16,000 जणांचे शोषण झाल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
अन्य इतर देशांप्रमाणे फ्रान्समध्येही चर्चच्या कृष्णकृत्यांकडे डोळेझाक करण्यात आली होती. त्याची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या या आयोगाने तब्बल 2,500 पानांचा अहवाल सादर केला आहे. हा आयोग अडीच वर्षे काम करत होता. या काळात अनेक पीडीत व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात अनेक साक्षीदारांच्या साक्षीही नोंदवण्यात आल्या आहेत.
चर्च, कोर्ट, पोलीस आणि प्रसिद्धी माध्यमांकडील शेकडो नोंदीही तपासण्यात आल्या आहेत. या कामासाठी एक हॉटलाईन सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळातच 6,500 व्यक्तींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क साधून लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची माहिती या आयोगाला दिली होती.