लंडन – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या विरोधात लंडनमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. बलुच आणि सिंध नागरिकांनी ही निदर्शने केली. ब्रिटनच्या संसदेच्या चौकात ही निदर्शने केली गेली. अल्पसंख्यांकांच्या हत्या आणि दडपशाही घडवणाऱ्या पाकिस्तानला ब्रिटनने आर्थिक मदत करणे थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी हे ब्रिटनच्या दौऱ्यावर आले असल्यामुळे ही निदर्शने करण्यात आली.
पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून नागरिकांचे अपहरण केले जात असल्याच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तानी गुप्तचरांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकार, राजकीय कार्यकर्ते आणि अन्य कोणाचेही “आयएसआय’कडून अपहरण केले जात असते. त्याचा यावेळी निषेध करण्यात आला. पाकिस्तानमध्ये वांशिक नरसंहार घडत आहे. या वांशिक नरसंहारामध्ये बलुच, हजारा, हिंदू, शीख आणि अहमदिया वंशाचे लोक बळी जात आहे. या वंशांच्या नागरिकांना आपल्याच देशामध्ये निर्वासित केले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानची भूमिका दुटप्पीपणाची आहे. याबद्दल ब्रिटीश सरकार, ब्रिटनच्या संसद सदस्यांकडे अधिकृत तक्रार केली जाणार असल्याचे या निदर्शकांनी सांगितले. पाकिस्तानमुळे अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी आपत्ती निर्माण झाली आहे, असा आरोपही या निदर्शकांनी यावेळी केला.
तत्पूर्वी काल लंडनमध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर शेकडो निदर्शक जमा झाले होते. त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.