पुणे – “करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गणेश मूर्तींचे जागेवरच विसर्जन करायचे आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करायची नाही, असे पोलीस वारंवार सांगत आहे. असे असतानाही काही मंडळे विसर्जन मिरवणूक काढत असल्याचा प्रकार घडत आहे. कोणीही मिरवणूक काढल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करू,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळे व बहुतांश मंडळांकडून पुणे पोलीस व महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. असे असतानाच गुरूवारी उत्तमनगर, शनिवारवाडा परिसर व अन्य काही भागांत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत साउंड स्पीकर लावून गाणी वाजवण्यात आली. त्याचबरोबर अनेकजण कुटुंबांसह त्यामध्ये सहभागी झाली होती.
गुप्ता म्हणाले, “यंदाचा गणेशोत्सव, विसर्जनाचा कार्यक्रमही साध्या पद्धतीने करण्याबाबत आम्ही नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत पुणेकरांनी सहकार्य करत मिरवणूक टाळत साध्या पद्धतीने विसर्जन केले. असे असताना उत्तमनगर व अन्य काही भागांत मिरवणुकीचा प्रकार घडल्याचे समजले. हा प्रकार गंभीर आहे.’
रस्त्यांवर गर्दी…
विसर्जनापूर्वीच्या वीकेंडचा मुहुर्त साधत काही पुणेकरांनी मानाचे इतरही प्रमुख गणपतींचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी गर्दी केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची मात्र प्रचंड धावपळ होताना दिसले. कसबा गणपती, मंडई, तांबडी जोगेश्वरी यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. तर लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळथथवंत चौक, शिवाजी रस्ता अशा सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसून आले. यामुळे पोलिसांनी विविध ठिकाणी एकेरी रस्ता, तर काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे बंद केले होते.