छान किती दिसते फुलपाखरू
फुलावर उडते फुलपाखरू
आमच्या शाळेतली कविता आठवते. तेव्हा ती परीक्षेसाठी पाठ केली जायची. फुलपाखराचा सुंदर मोहक रंग बघणाऱ्याचे मन मोहून टाकणारा. अंडी, कळी, कोष आणि फुलपाखरू अशा या जीवाच्या अवस्था असतात. अंड्यात सुरवंट असतो त्याचे फुलपाखरू बनते. खरं तर सुरवंट किती काटेरी आणि फुलपाखरू तितकेच सुंदर! निसर्गाची किमया दुसरं काय?
फुलपाखरांच्या जाती तरी किती, एकट्या पश्चिम घाटात 200 प्रजाती आहेत. फुलपाखरू सतत या फुलावरून त्या फुलावर बसते. हे बघतानाही गंमत वाटते; पण काय आहे ना, फुलपाखरं मिशांनी वास घेतात आणि पायांनी चव घेतात.
फुलपाखरू फुलांचे रंग घेतात. त्यांच्यावरची नक्षी, रंग तर सुंदरच असतात. काही मुले लहानपणी फुलपाखरू मारून टाचण्यांनी वहीत टोचून ठेवतात. हा क्रूरपणा लहानपणीच आवरला पाहिजे.
जसं पक्ष्यांचं, प्राण्यांचे संग्रहालय असतं तसं फुलपाखरांचंही आहे. ते किती सुंदर रंगीबेरंगी असेल याची कल्पना येते! फुलपाखरू दिवसा जास्त क्रियाशील असते. रात्री दिसत नाही. आपल्याकडे पाश्चात्य संस्कृती बोकाळली त्यामुळे प्रत्येक दिवस कुणाचा ना कुणाचा साजरा होत असतो, पण तुम्हाला माहीत आहे का, 4 मार्च हा दिवस फुलपाखरांचा दिवस म्हणून जाहीर केला आहे आणि महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्याने हा दिवस घोषित केला आहे.
फुलपाखरांचे जीवनचक्र अतिशय कमी काळाचं असतं, पण त्यातही प्रचंड आणि थक्क करणारी विविधता आहे. फुलपाखरांमुळे जंगले छान आणि टवटवीत राहातात. फुलपाखरं कीटकांवर जगतात. त्यामुळे झाडांवर विषारी कीटकनाशके मारली तर त्यांच्या जीवाला धोका होईल.
काहींची वृत्ती फुलपाखरासारखी असते. या फुलावरून त्या फुलावर उड्या मारतात. तशीच ही माणसे नात्यात इकडून तिकडे उड्या मारतात. फुलपाखरे सतत काहीतरी करत असतात. मुद्दाम काढलेल्या चित्रात इतकं वैविध्य नसतं. ते वैविध्य निसर्गाने निर्माण केलेल्या फुलपाखरांमध्ये दिसते.
– डॉ. नीलम ताटके