पुणे –सिंहगडावर पर्यटकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) उभारलेल्या पर्यटक निवास अत्याधुनिक सोयी-सुविधांसह पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाला आहे. महामंडळातर्फे मंगळवारी (दि.17) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात या पर्यटक निवासाचे लोकार्पण झाले.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सिंहगडावर पर्यटकांना वास्तव्य करण्यासाठी “एमटीडीसी’ने पूर्वी बांधलेल्या पर्यटक निवासाचे नुकतेच नूतनीकरण केले आहे. या पर्यटक निवासामध्ये
2 लोकनिवासांसह 3 खोल्या आणि उपहारगृहाची सोय आहे. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ऍम्फीथिएटरही आहे. या ठिकाणी विविध ग्रुपकडून मर्दानी खेळ आणि कला यांचे आयोजन आगामी काळात करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.