यवतमाळ – ग्रामीण भागात अजुनही महिलांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. कधी मुलीच्या जन्मामुळे तर कधी माहेराहून पैसे आणण्यासाठी. मात्र यवतमाळमध्ये सर्वकाही ठीक असताना नणंदेनं आपल्या भावाच्या पत्नीला अर्थात वहिनीला रॉकेल टाकून जीवंत जाळलं. या घटनेत वहिनीची प्राणज्योत मावळली.
मोनिका गणेश पवार असं मृत महिलेचं नाव आहे. मोनिका यांनी 4 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यांना चार वर्षाचा एक मुलगा देखील आहे. त्यामुळे एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार झाला होता. मात्र नणंदेला ही बाब चांगलीच खटकली.
मोनिका यांनी दुसऱ्या वेळी मुलीला जन्म दिल्यामुळे माहेरी आपल्या लेकीचा लाड कोण करणार, अशी भावना नणंदेची झाली. त्यामुळे तिने आपल्या वहिनी मोनिका यांना त्रास द्यायला सुरुवात केली. यावरून दोघींमध्ये वादही झाला. या वादातून आरोपी नणंदेनं वहिनीला जीवंत जाळलं.
या घटनेत मोनिका 80 टक्के भाजल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपी नणंद कांता संजय राठोड हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 302 नुसार गुन्हा दाखल केला.