नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील कार्यकाळातील वादग्रस्त ठरलेला राफेल करार आता पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. या कराराची फ्रान्समध्ये चौकशी होणार असून त्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती कऱण्यात आली आहे. हाच धागा पकडून काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला. ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘चोर की दाढी’ राफेल स्कॅम. एकूणच काँग्रेस राफेल करारावरून पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, राफेल करारात मोठ्या प्रमाणात लाच देण्यात आली. सुरजेवाला यांनी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. ओलांद यांनी म्हटलं होतं की, राफेल करारात रिलायन्स कंपनीला भागीदार करण्याचा निर्णय़ भारताचा होता. त्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय नव्हता.
दरम्यान फ्रान्समधील राष्ट्रीय आर्थिक अभियोक्ता कार्यालयाने (पीएनएफ) दिलेल्या माहितीनुसार भारताबरोबर झालेल्या राफेल व्यवहाराच्या गुन्हेगारी चौकशीसाठी एका न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे.
चोर की दाढ़ी…#RafaleScam
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2021
पीएनएफने सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला होता. मात्र फ्रान्समधील शोध पत्रकारिता करणाऱ्या ‘मीडियापार्ट’ वेबसाईटने या करारात भारतातील अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये लाच म्हणून दिल्याचे म्हटले आहे. या करारातील घोटाळ्यासंदर्भात मीडियापार्टने वृत्त मालिका लावली होती. त्यामुळे पीएनएफला चौकशी करावी लागली आहे.