नवी दिल्ली – दुसरी लाट ओसरण्यास वेगाने सुरूवात झाली असून रूग्णसंख्या कमी होत असल्याचे दिलासा देणारे चित्र आहे. देशात आज सलग सातव्या दिवशी नव्याने बाधित आढळणाऱ्या करोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आहे. आरोग्य मंत्रालयाने याविषयीची सविस्तर आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशात गेल्या 24 तासांत एक लाख 34 हजार 154 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर दोन लाख 11 हजार 499 करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे देशातल्या सक्रिय म्हणजे ज्यांचे उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या आता 17 लाख 13 हजार 413 वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता अडीच कोटींच्या पुढे गेला आहे.
देशात काल दिवसभरात करोनामुळे 2 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख 37 हजार 989 वर पोहोचला आहे. नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे स्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता बळावली आहे.