पाटणा – अमेरिकेत लहान मुलांवरील लसीची चाचणी घेऊन तेथे लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असताना आता भारतातही लहान मुलांवर करोना लसीच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. बिहारच्या पाटणा येथील एम्समध्ये संपूर्ण भारतीय कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
चाचणी यशस्वी झाल्यानंतर लस विकसित करण्यात मदत होणार आहे. सध्या तीनच मुलांना या चाचणीत सहभागी करून घेण्यात आले आहे. पाटणा एम्समधील कोविड प्रभारी डॉक्टर संजीव कुमार यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. 12 ते 17 वयोगटातील मुलांची चाचणी करण्यात येते आहे. मंगळवारी या तीन मुलांना इंजेक्शन देण्यात आले व त्यांच्यावर कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचे आढळून आल्याचे त्यांनी नमूद केले.
महिनाभरात साडेपाचशे मुलांवर अशा प्रकारे चाचणी केली जाणार आहे. यातील किमान शंभर मुलांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर तीन मुलांवर चाचणी केली गेली. दुसऱ्या टप्प्यात लसीचा मुलांवर कुठलाही साइड इफेक्ट न दिसल्यावर तिसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल आणि त्याचा योग्य प्रभाव दिसून आल्यावर लस मंजुरीसाठी पाठवली जाईल, असे संजीव कुमार म्हणाले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेत जी ऑक्टोबरच्या सुमारास येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, त्यात लहान मुलांना विशेष धोका असल्याचे दावे केले गेले आहेत. मात्र तज्ज्ञांनी हे दावे फेटाळले आहेत. या दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी सुरूवातीच्या बातम्यांमुळे पालकांमध्ये भयाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारला अगोदर ही भीती घालवावी लागणार आहे.
अर्थात करोनाचा नायनाट करण्यासाठी केवळ लस हेच शस्त्र असल्यामुळे सगळ्याच वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी लागणार आहे व लहान मुले त्यापासून वंचित राहणार नाहीत याचीही खबरदारी सगळेच देश घेत आहेत. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांमध्ये 16 वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. जगभरात लहान मुलांसाठी लसीची चाचणी सुरू आहे.