नवी दिल्ली – देशात करोना संकट कमी होत असताना ब्लॅक फंगसची दहशत कायम आहे. आजाराची तीव्रता पाहता राजस्थान सरकारने ब्लॅक फंगस साथीचा आजार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्याच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. राजस्थान रोग नियंत्रण अधिनियम -2020 च्या कलम 4 अंतर्गत ब्लॅक फंगस साथीचा आजार असल्याचं अधिसूचित केलं गेलं आहे.
याची घोषणा करताना गहलोत सरकारने सांगितले की, ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून बर्याच राज्यात हा आजार झपाट्याने पसरत आहे, म्हणून त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राजस्थानमध्ये जवळपास 100 जणांना ब्लॅक फंगस झाल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे जवळपास दोन हजारांवर रुग्ण सापडले असून गुजरातमध्ये हा आकडा एक हजार 163 इतका आहे. मध्य प्रदेशमध्ये 281 रुग्ण तर 27 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, तेलंगना, ओडिशा या राज्यातही ब्लॅक फंगसचे रुग्ण सापडत आहेत.
दरम्यान, देशातील वाढत्या ब्लॅक फंगस आजाराप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी चिंता व्यक्त केली होती. राजस्थानमध्ये या रुग्णांच्या उपचारासाठी जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात एक वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.