- दिवसभरात 13 जणांचा मृत्यू
- उपचाराधीन रुग्णांची संख्या 14035
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा तब्बल 1818 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 28 हजार 747 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1811 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 7 जणांचा करोना अहवाल सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील सातजण शहरातील रहिवाशी होते. तर शहराबाहेरील सहाजणांचा उपचार सुरू असताना गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1950 वर पोहोचला असून शहराबाहेरील 821 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2771 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील संत तुकारामनगर, फुगेवाडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, दिघी येथील सातजणांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दीबाहेरील पाबळ, जुन्नर, खडकी, पुणे, चाकण येथील रहिवाशी असलेल्या सहाजणांचा मृत्यू आज दिवसभरात झाला आहे. आतापर्यंत शहरातील 1 लाख 12 हजार 762 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 8486 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1949 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 4124 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.