कोल्लम – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सागरी सफर करताना अचानकपणे नावेतून पाण्यात उडी घेतली. त्यामुळे राहुल यांच्यासमवेत नावेतून प्रवास करणारे मच्छिमार भयचकित झाले. मात्र, राहुल लीलया पोहत असल्याचे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला.
लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या केरळच्या दौऱ्यावर सध्या राहुल आहेत. त्या दौऱ्यादरम्यान मच्छिमारांच्या जीवनाचा अनुभव घेण्याचे राहुल यांनी ठरवले. त्यातून ते थान्गास्सेरी समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. किनाऱ्यावरून 23 मच्छिमारांसमवेत ते नावेतून सागरी सफरीवर निघाले. काही अंतरावर गेल्यावर मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी पाण्यात त्यांचे जाळे फेकले. त्याकामी राहुल यांनीही मदत केली. ते जाळे पाण्यात व्यवस्थित पसरवण्यासाठी काही मच्छिमारांनी समुद्रात उड्या घेतल्या. त्यांच्या पाठोपाठ राहुल यांनीही समुद्रात उडी मारली. काही न सांगताच राहुल यांनी ती कृती केल्याने काही क्षण मच्छिमार गोंधळले. मात्र, राहुल एखाद्या निष्णात जलतरणपटूसारखे पोहत असल्याचे पाहून मच्छिमारांच्या मनात उडालेल्या गोंधळाची जागा कौतुकाने घेतली.
राहुल सुमारे 10 मिनिटे समुद्रात पोहले. निळा टी-शर्ट आणि खाकी ट्राऊझर या कपड्यांनिशी राहुल यांनी स्वत:ला समुद्रात झोकून दिले. नंतर किनाऱ्यावर पोहचल्यावर त्यांनी अंगातील ओले कपडे बदलले. अडीच तासांच्या सागरी सफरीवेळी मच्छिमारांनी नावेतच फिश करी बनवली. तिचा आस्वादही राहुल यांनी घेतला.