पुणे – चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून करणाऱ्या आजन्म कारावासाची शिक्षा सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी सुनावली. याबरोबरच त्याला पाच हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे खून करून तो स्वत: वारजे पोलिसांत झाला हजर. मी पत्नीचा खून केला आहे, असे त्यांने पोलिसांनी सांगितले होते. पोलिसानी कुऱ्हाड आणि आरोपीच्या अंगावरील कपडे जप्त केले होते. पत्नीच्या डोके आणि मानेवर वार करण्यात आले होते.
राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने राहत्या घरी पत्नी सविता यांचा खून केला होता. 30 जानेवारी 2015 रोजी झालेल्या या घटनेबाबत विनोद सुभाष दाभाडे (रा. वारजे जकात नाक्याजवळ) यांनी फिर्याद दिली होती.
या खटल्याचे कामकाज सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदाराने त्याला घराची कडी लावून बाहेर जाताना पाहिल्याची साक्ष महत्त्वाची ठरली.
खून करण्याच्या एक महिना आधी सविता यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. हा फोन आल्याचे दुसाणे याने पाहिले होते. तेव्हापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. तसेच एक दिवस सविता यांच्या साडीचा पदर पेटवून दिला होता. त्यांच्या मुलीने ती आग विझवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.