जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपविरुद्ध पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र त्यांच्या मागे आता ईडीची चौकशी लागली आहे. त्याला खडसे यांनी आक्रमकतेने उत्तर दिले आहे.
‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन असे, मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे,’ असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला आहे. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खडसे बोलत होते.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना जयंत पाटील यांनी, ‘तुम्ही भाजप सोडताय तर ते तुमच्या मागे ईडी लावतील’ अशी मिश्किल टिपण्णी केली होती. यावर उत्तर देत खडसे म्हणाले होते, ‘ त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन.’ खडसेंकडे नेमकी कोणती सीडी आहे याबाबत सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मध्यंतरी सीडीवरून खडसे शांत झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र खडसे यांनी आपल्याकडे सीडी असल्याचे सांगत ती लावण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.