राजगुरूनगर -खेड तालुक्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाळुंगे इंगळे येथील म्हाडातील करोना सेंटर बंद करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. खेड तालुक्यातील स्वॅब तपासणीबाबत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांना स्वॅब तपासणीसाठी खाजगी लॅबचा आधार घ्यावा लागणार आहे. खेड तालुक्यातील कोविड सेंटरची पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यातील वाढत्या करोना रुग्णांसाठी चांडोली येथील समाजकल्याणचे वसतिगृह आणि महाळुंगे येथे म्हाडामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. आता चांडोली कोविड सेंटर एक महिन्यापूर्वी बंद करण्यात आले आहे. तर महाळुंगे कोविड केअर सेंटरच्या म्हाडाच्या इमारती खाली करण्यास सांगण्यात आले आहे; मात्र कोविड सेंटरला पर्यायी जागा उपलब्ध करण्यास महसूल, आरोग्य प्रशासनाकडून अद्यापही याबाबत हालचाली नाहीत. तालुक्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. तालुक्यातील स्वॅब तपासणी बंद करू नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी केली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबरोबरच प्रजासत्ताक दिन या अनुषंगाने झालेली गर्दी पाहता रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली होती. तालुक्यात 1 फेब्रुवारीनंतर रुग्णवाढीचा आलेख कमी-जास्त होताना दिसत आहे. नागरिकांच्या मनातील करोना विषाणूची भीती संपुष्टात आल्याचे चित्र तालुक्यात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरणे कमी झाले आहे. सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे, यातून करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
चार दिवसांत शंभरावर रुग्ण
तालुक्यात दररोज 10 ते 20पर्यंत नवीन बाधित व्यक्ती आढळत असल्याने तालुक्यात पुन्हा करोनाची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील चार दिवसांत तालुक्याची नव्याने बाधित संख्या 100वर पोहचली आहे. तालुक्यात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला असून याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.