मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका निर्दयी बहिणीने भावाकडून बदला घेण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. भावाला धडा शिकवण्यासाठी तिने चक्क भावाच्या मुलाचे अर्थात आपल्याच भाच्याचे अपहरण केले. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे 10 वर्षांच्या भाच्याचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले.
ट्रान्सपोर्ट नगर पोलिसांनी मुलाला 24 तासांत शोधून आई-वडिलांकडे सोपविले. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह एका पुरुष आरोपीला अटक केले आहे. मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलाला दोन महिला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चार टीम केल्या. त्यानंतर या टीमने अनेक सीसीटीव्ही तपासून मुलाचा शोध लावला.
तपासात मुलाचे अपहरण त्याच्या आत्त्यानेच केल्याचे समोर आले. आरोपी आत्त्याने तिची मैत्रीण पूजा आणि एका युवकाच्या साथीने मुलाचे अपहरण केले. आत्त्याने मुलाची हत्या करण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी वेळीच तपास करून मुलाचा जीव वाचवला. तपासात आत्त्याने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी अपहरण केल्याचे सांगितले. लग्नानंतर मी माझ्या पतीला सोडून एका परपुरुषाबरोबर राहात होते. त्यामुळे संतापलेल्या भावाने अर्थात अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांनी माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याकडे सोपविले. त्यामुळे आपल्या मनात भावाला धडा शिकविण्याचा विचार आला. त्यामुळे आपण भावाच्या मुलाचे अपहरण केल्याचे आरोपी महिलेने सांगितले.