पुणे –शहरात आज नव्याने 264 करोना बाधित सापडले आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुदैवाने जानेवारीचे दोन आठवडे संपत आले असून, शहरातील बाधित संख्या नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
गेल्या 24 तासांत शहरात करोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. सक्रीय बाधितांची संख्या कमी झाली असून, 2 हजार 689 बाधित उपचार घेत आहेत. त्यातील 208 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 305 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.
दिवसभरात 214 बाधितांना घरी सोडण्यात आले आहे, तर आज 3 हजार 954 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे.
शहरातील करोना बाधितांची संख्या नियंत्रणात असली, तरी ती कमी कशी होईल यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.