वाघोली (पुणे) – वाघोली-केसनंद रस्ता येथून गायत्री पार्कच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजच्या कामास शनिवारी (दि. 9) सुरुवात करण्यात आली. या रस्त्यावरील परिसर व सोसायट्यांचा ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वॉर्ड क्रमांक सहामधील शांती पार्क, लुंकड ब्लॉसम सोसायटी, स्वामी समर्थ सोसायटी, प्रयागधाम सोसायटी, गायत्री पार्क या भागातील ड्रेनेजची समस्या सोडविण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने ड्रेनेज लाइनचे काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप सातव, मालती गोगावले, जयश्री काळे यांनी ग्राम निधीमधून ड्रेनेज लाइनचे काम सुरु केल्यामुळे अनेक सोसायट्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वॉर्ड क्रमांक सहामधील अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण, हायमास्ट दिवे आदी बहुतांश मुलभूत समस्या मार्गी लागल्या असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.