- आरटीओ कार्यालयाला 32 कोटींचा महसूल
पिंपरी – करोनाचे घोंघावणारे संकट बाजूला सारत, दिवाळीचा मुहूर्त साधत शहरात नऊ हजार नव्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांच्या नोंदणीमधून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला 32 कोटी 20 लाख एक हजार 84 रुपयांचा घसघशीत महसूल मिळाला आहे. ही नोंदणी 1 ते 17 नोव्हेंबर या सतरा दिवसांतील आहे.
मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराला याची मोठी झळ बसली. एकाही उद्योगाचे शटर सहा महिने उघडले नाही. त्यामुळे अर्थकारण ठप्प झाले. परिणामी शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या ऑटोमोबाइल सेक्टरला घरघर लागली. त्यामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर झाले. मात्र, करोनाचा प्रदुर्भाव सुरू असतानाच एमआयडीसीतील उद्योगांना 30 टक्के मनुष्यबळावर उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. याकाळात सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीएमएलची बससेवादेखील बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच या बसगाड्या धावत होत्या. परिणामी स्वत:चे वाहन त्यातल्या त्यात दुचाकीची निकड अधिक प्रकार्षाने जाणवली.
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असली, तरीदेखील पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कक्षेत ग्रामीण भागातील काही तालुके येत असल्याने दरवर्षी हे कार्यालय पसंतीचे क्रमांक, वाहन नोंदणी, विविध कर संकलन, प्रमाणपत्र, वाहन परवाने अशा विविध बाबींमधून उत्पन्नाचे नवनवे विक्रम रचत आहे. यंदा करोनाचे सावट असल्याने दिवाळीतील वाहन नोंदणीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. करोनाच्या संकटाला बाजूला सारत, या कार्यालयात सतरा दिवसांत 9 हजार 338 नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यामधून 32 कोटी, 20 लाख एक हजार 84 रुपयांचा घसघशीत महसूल आरटीओला मिळाला आहे.
दुचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल
लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने स्वत:चे वाहन नसलेल्या कामगारांना कामावर पोचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर अद्यापही पूर्ण क्षमतेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झालेली नाही. त्यामुळे स्वत:च्या मालकीचे वाहन असण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
दसऱ्याला 24 कोटींचा महसूल
मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दसऱ्यानिमित्त साडेतीन हजार वाहनांची नोंद झाली होती. त्यातून परिवहन कार्यालयास 24 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. गतवर्षीपेक्षा वाहन नोंदणीत कमालीची घट पाहण्यास मिळाली. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 1 हजार 923 दुचाकी वाहनांची तर, 1 हजार 460 मोटारीची नोंद झाली. 247 इतर अशी एकूण 3 हजार 360 वाहने नोंदवली गेली. तर, दसऱ्याच्या दिवशी केवळ एकूण 107 वाहने नोंद झाली होती. या माध्यमातून 24 कोटी 13 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.