अवसरी खुर्द (पुणे)-आंबेगाव तालुक्यात आज शेतकऱ्यांनी आपल्या गाय आणि वासराची मनोभावे पूजा केली. विविध गावांमध्ये गायींच्या पूजनाने वसुबारस साजरी करण्यात आली. अतिवृष्टी आणि कोरोनाच्या काळात मनाला उभारी देणाऱ्या या दिवाळी सणाला सुरुवात झाली.
मोठ्या भक्तीभावपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आकर्षक रांगोळ्या, आकाशकंदील आणि पणत्यांनी उजळलेले घर आणि परिसर अशा पारंपरिक पद्धतीनं नागरिकांनी दीपोत्सवाच स्वागत केलं. मराठी वर्षात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. वर्षभरात येणारे सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. गाय ही पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा मोठ्या भक्ती भावाने केली जाते. आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांत गाई वासरांचे पूजन करुन शेतकऱ्यांनी वसुबारस साजरी केली. घरातील गृहिणी आणि इतर सदस्यांनी गायीला हळद कुंकू लावून तिची मनोभावे पूजा केली. त्यानंतर गाय व वासरांना गोडाचा नैवैद्य देण्यात आला.