सातारा -गुगल पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून मोबाइल रिचार्जला गेलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने वैशाली सुधीर कांबळे (रा. विलासपूर, ता. सातारा) यांची 98 हजार 462 रुपयांची फसवणूक केली. या भामट्याने “एनी डेस्क’ हे ऍप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करायला वैशाली कांबळे यांना सांगून त्याद्वारे त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम काढून घेतली. याप्रकरणी वैशाली कांबळे यांच्या फिर्यादीवरून अरविंदकुमार नावाच्या भामट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 7364800328 या मोबाइल क्रमांकावरून कांबळे यांचा मोबाइल क्रमांकावर गुरुवारी (दि. 29) कॉल आला. आपण गुगल पे कस्टमर केअर सेंटरमधून अरविंद कुमार बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. मोबाइल रिचार्ज करण्यासाठी गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी मोबाइलमध्ये एनी डेस्क हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा, असे त्याने सांगितले. त्यानुसार वैशाली कांबळे यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये ते ऍप डाऊनलोड केले. त्या ऍपच्या माध्यमातून संशयिताने आयडीबीआय बॅंकेतील कांबळे यांच्या खात्याचा ऍक्सेस मिळवला. या खात्यातून संशयिताने 98 हजार 462 रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करत आहेत.