पुणे – पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी-जुलै 2019 मध्ये 49,000 तर जानेवारी-जुलै 2021मध्ये 53,000 घरांची विक्री होत यामध्ये 8% इतकी वाढ झाली. जानेवारी-जुलै 2019 मध्ये 21 हजार 500 कोटी रुपये तर जानेवारी-जुलै 2021 मध्ये 27 हजार 500 कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री झाली. यामध्ये विक्रीमूल्यात तब्बल 27% वाढ पहायला मिळाली.
विक्री मूल्यात झालेली वाढ ही आकाराने मोठ्या असलेल्या घरांच्या खरेदीमुळे झाली आहे. पुण्याचा वायव्य भाग म्हणजेच हिंजेवाडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर,सूस, बालेवाडी सोबत पिंपरी चिंचवड भागाला गृहखरेदीदारांची पसंती असल्याचे आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र हळूहळू वाढीच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या 38 व्या सर्वसाधारण सभेमध्ये सीआरई मॅट्रिक्स यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुणे हाऊसिंग रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. या वेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, सचिव अरविंद जैन, उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता उपस्थित होते.
अनिल फरांदे म्हणाले, अहवालात नमूद 2019 व 2021 चे आराखडे हे आशावादी आहेत. पुणे हाऊसिंग रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीचा फायदा पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना होईल अशी आशा सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता यांनी व्यक्त केली.
2 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री ही जानेवारी ते जुलै 2019 दरम्यान 1 हजार 250 कोटी रुपये इतकी होती. हीच विक्री जानेवारी- जुलै 2021 दरम्यान 2 हजार 350 कोटी रुपये इतकी झाली. 70 लाखांहून कमी किंमत असलेल्या घरांची विक्री ही जानेवारी- जुलै 2019 मध्ये 69% इतकी होती तीच विक्री जानेवारी- जुलै 2021 मध्ये घटून 63% इतकी झाली. जानेवारी ते जुलै 2021 या कालावधीत मोठ्या आकाराच्या प्रकल्पांची संख्या वाढल्याचे समोर आले.