मुंबई – 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांना 8.5 टक्के व्याज दिले जाईल. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सहा कोटींहून अधिक खातेदारांना होणार आहे. इतर क्षेत्रातील व्याजदर कमी पातळीवर असतांनाही निधीवरील व्याजदरात मात्र कपात करण्यात आली नाही. त्यामुळे दिवाळीत कामगारांना दिलासा मिळाला आहे.
अर्थमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून हे व्याज लवकरच सभासदांच्या खात्यात जमा करण्यत येणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात अनेक ग्राहकांना व्याज मिळविण्यासाठी 8 ते 10 महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. कामगार सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की लवकरच हा आदेश अधिसूचित करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणारी ईपीएफओ कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
पी एफ खात्याच्या वेबसाईटवर या संधातील तपशील मिळू शकणार आहे. प्रोफाइलमधून पीएफ मेंबर, ईपीएफ पेंशनर, एम्प्लायर, यापैकी पर्याय सभासदांना निवडता येणार आहे. तक्रारीसाठी पीएफ मेंबर निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, युएएन क्रमांक आणि पासवर्ड टाकून वैयक्तिक माहिती मिळविता येणार आहे.
या वर्षी च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही, तो तसाच ठेवण्यात आला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. कोविड महामारीमुळे गेल्या एका वर्षात योगदानापेक्षा जास्त पैसे काढले गेले आहेत. मार्च 2020 मध्ये पीएफवरील व्याजदर 8.65 टक्क्यांवरून 8.5 टक्के करण्यात आला. सात वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. 2012-13 मध्ये पीएफवर याच दराने व्याज देण्यात आले होते.