पुणे – सन 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाची 52 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने दि. 4 नोव्हेंबर रोजी दक्षिण सदर्न कमांड येथील “मिल्खा सिंग स्पोर्टस कॉम्प्लेक्स’ मुख्यालयात “मोटर सायकल डेअर डेव्हिल शो’चे आयोजन करण्यात आले होते.
“मोटार सायकल रायडर्स डिस्प्ले टीम’, “कॉर्प्स ऑफ सिग्नल्स’ची “डेअर डेव्हिल्स’ ही भारतीय लष्कराची सर्वात जुनी कामगिरी करणारी “डिस्पॅच रायडर डिस्प्ले टीम’ आहे. ही टीम 1935 मध्ये जबलपूरमध्ये स्थापन झाली. या टीमने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पराक्रम गाजवले आहेत. आजपर्यंत या टीमने 29 जागतिक विक्रम स्थापित केले आहेत.
त्यात “गिनिज आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, “एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ यांचा समावेश आहे.
“मोटार सायकल रायडर्स डिस्प्ले टीम “डेअर डेविल्स’चे प्रमुख सुभेदार प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली 28 इतर “डेअर डेव्हिल्स टीम’ सदस्य होते.
“डेअर डेविल्स” ही टीम असामान्य निर्णयक्षमता, अतुलनीय धैर्य आणि मोटर सायकल हाताळण्यात अचूकता यात प्रवीण आहे. 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना या टीमने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी थरारक आणि धडाकेबाज प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी लष्करी अधिकारी, सैनिक, सैनिकांचे कुटुंबिय, यावेळी लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी टीमचा सत्कार केला.