5 State Election – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची निवड करताना भाजपाने दोन केंद्रिय मंत्री आणि चार विद्यमान खासदारांना विधानसभेचे तिकिट दिले आहे. साधारण हाच फॉर्म्युला वापरुन भाजपा अन्य राज्यांतही जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रामुख्याने राजस्थान आणि छत्तीसगडवर चर्चा झाली. या दोन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता असून भाजप येथे सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. पक्षाच्या केंद्रिय कार्यकारिणीच्या मते, अनेक मोठे चेहरे, केंद्रिय मंत्री आणि काही विद्यमान खासदार विधानसभा निवडणूक लढवू शकतात. छत्तीसगडमध्ये 90 जागा असून, उर्वरित 69 जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर सदस्य उपस्थित होते.
राजस्थानशी संबंधित बैठकीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, भाजपचे राजस्थानचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी, प्रभारी अरुण सिंह आणि राज्य युनिटचे प्रमुख सीपी जोशी हेही उपस्थित होते. त्याचवेळी छत्तीसगडशी संबंधित केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री रमण सिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साओ आणि निवडणूक प्रभारी मनसुख मांडविया यांच्यासह राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थिती नोंदवली.
या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र भाजपकडून अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
या वर्षाच्या अखेरीस राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने याआधीच मध्य प्रदेशसाठी दोन आणि छत्तीसगडसाठी एक उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत.
मध्य प्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह चार खासदारांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप राजस्थानमध्येही या राज्यातील काही केंद्रीय मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. आणखी काही खासदारांना उमेदवारी देण्याचीही चर्चा आहे.