लोकशाहीच्या परंपरा न टिकवाल तर देशात “राक्षसशाही’ अवतरेल!
हैदराबाद, ता. 26 – देशात पार्लमेंटरी लोकशाहीच्या उत्तम परंपरा आपण जर कायम ठेवल्या नाहीत तर आपल्या लोकशाहीचे राक्षस शाहीत रूपांतर होईल, असे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी आज म्हटले. राजकारणात आज खिलाडूवृत्ती राहिलेली नाही.
खिलाडूवृत्ती स्वीकारून देशात राजकारणी पुढाऱ्यांनी निरोगी अशी लोकशाही बळकट केली पाहिजे. आज कायदेमंडळात आपणास काय दृश्य दिसले? आरडाओरडा, गोंधळ सभापतीविषयी अनादर व अशिष्ट वर्तन याचा नुसता बाजार भरला आहे.
जातीवादी संघटनांनी विधायक कार्य करावे
पुणे – जातीजातीमधील संघटना असल्यातरी बिघडत नाही परंतु त्या संघटनांद्वारे द्वेषाऐवजी समाजोन्नतीचेच कार्य व्हावे व विधायक प्रवृत्ती वाढावी अशी अपेक्षा आमदार संभाजीराव काकडे यांनी बोलून दाखविली.
नागपुरात हात-रिक्षा ऐवजी ऑटो रिक्षा येणार
नागपूर – हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. येथील इंडस्ट्रियल सर्व्हिस इन्स्टिट्यूटतर्फे काल हाताने रिक्षा ओढणाऱ्या दोघा जणांना ऑटो रिक्षा दिल्या आहेत. अजून महिनाभरात अशाच पाच ऑटो रिक्षा देण्यात येणार आहे.
देशी मोटारींची निर्यात
मुंबई – “प्रीमियर प्रेसिडेंट’ कंपनीच्या सहा “कार्स’चा पहिला हप्ता मॉरिशसला निर्यात करण्यात आला. अशाप्रकारे संपूर्ण देशी बनावटीची मोटारकार निर्यात करण्याचा भारताचा पहिलाच प्रसंग आहे.
बदलापूर येथे स्कूटरचा नवा कारखाना
पुणे – बदलापूर येथे नवीनच स्कूटरचा कारखाना सुरू होत असून त्याचे उत्पादन पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. कारखानदार लाला यांना याबाबत केंद्र सरकारने स्कूटर उत्पादनाचा परवाना दिला आहे.