पाणी ः दहा पैसे घागर
कोल्हापूर, दि. 14 – सदर बाजार विचारे माळावरील सुमारे दोन हजार झोपडवासीयांना पिण्याचे पाणी दहा पैशाला एक घागर याप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. मजुरी करून जीवन जगणाऱ्या या गरिबांना पाण्याअभावी कष्ट पडत आहेत तेव्हा पिण्याच्या पाण्या अभावी झोपडवासियांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने पाण्याचा नळ द्यावा अशी मागणी होत आहे.
पूरग्रस्तांना सोयी करून द्या
पुणे – पूरग्रस्त वसाहतींना स्वतंत्र नळाची सोय त्वरित उपलब्ध करून न दिल्यास त्याविरूद्ध जनता योग्य ते आंदोलनाचे पाऊल उचलेल असा इशारा शहर शिवसेनेने दिला आहे.
लोणावळ्याचा पाणीप्रश्न
लोणावळा – लोणावळा शहराच्या सर्व भागातील लोकांचे पाण्याअभावी होणारे हाल दूर व्हावेत यासाठी नागरिकांनी आंदोलन करून पाण्याची मागणी केली आहे.
असेही एक विमान
काडिंग्टन (इंग्लंड) – प्लायवूड व नायलॉन यांच्यापासून बनविलेले व हेलियम गॅसच्या साहाय्याने हवेत संचार करणारे एक वेगळ्या प्रकारचे गोलाकार विमान येथील जॉन वेस्ट व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे. त्याला “स्काय शिप’ म्हणतात. त्याच्या उड्डाणाचे जमिनीवरून रेडिओच्या साहाय्याने नियंत्रण करण्यात येईल. वेस्ट म्हणाले, या विमानाद्वारे वेगवान व स्वस्त दराने वाहतूक करू शकू.