सर्वांची प्रगती होईल अशा योजना- इंदिराजी
शिलॉंग, दि. 25 – डोंगर, टेकट्या, दऱ्या, पठारे, गावे खेडी आणि शहरे येथे राहणाऱ्या लोकांची प्रगती व्हावी अशाच विकास योजना आखण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या. येथे 66 कोटी रुपयांच्या वीजनिर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केली.
पत्रकारांची एकजूट आवश्यक
पुणे – महाराष्ट्रातील श्रमिक पत्रकार संघाचे कार्य पाहून इतर प्रांतात त्याचा आदर्श म्हणून उपयोग व्हावा असे कार्य पत्रकार संघाचे आहे. त्यामुळे पत्रकारांनी एकजुटीने राहावे, असे सीताराम कोळपे म्हणाले.
कार्यकर्त्यांनी कर्तव्य भावनेने काम करावे
पुणे – गरीब जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेवर पूर्णपणे विसंबून राहू नये, असे परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले. गरीब जनतेसाठी सरकारने जे काही केले आहे त्याप्रमाणे यापुढेही करीत राहील. परंतु पिढ्यान्पिढ्या दबल्या गेलेल्या समाजासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कर्तव्य भावनेने काम केले पाहिजे. गरीब व भूहिनांना घरांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जरूर तो निधी उभा करावा. गरजू गरीब व्यक्तीला घर उपलब्ध नसणे ही शरमेची गोष्ट आहे, असेही चव्हाण म्हणाले.