पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 44 हजार ईव्हीएमची (इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशिन) प्राथमिक तपासणी पूर्ण झाली आहे. कोरेगाव पार्क येथील गोदामामध्ये या सर्व मशिन सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,
अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांच्या मतदानासाठी महत्त्वाचे असलेले ईव्हीएम निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे. या मशीन नवीन आहेत. ईव्हीएममध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांचा समावेश होतो.
जिल्ह्यातील सर्व ईव्हीएम एकाच ठिकाणी म्हणजे कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवल्या आहेत. लवकरच त्या पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जातील. ईव्हीएम स्थलांतरावेळी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त सोबत असेल. तसेच वाहनांना जीपीएस ट्रॅकर बसविला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी दिली.
लोकसभा मतदारसंघ – ईव्हीएम ठेवण्याचे ठिकाण (स्ट्राॅंग रुम)
पुणे – एफसीआय गोदाम कोरेगाव पार्क, पुणे
बारामती – एफसीआय गोदाम कोरेगाव पार्क, पुणे
मावळ – बालेवाडी स्टेडियम, पुणे
शिरुर – वखार महामंडळाचे गोदाम, रांजणगाव (कारेगाव) एमआयडीसी ता. शिरुर
जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेची स्थिती
8,382 : मतदान केंद्र
बॅलेट युनिट : 20 हजार 117
कंट्रोल युनिट : 10 हजार 59
व्हीव्हीपॅट : 10 हजार 897