तिरुवनंतपुरम – कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे सुरू असलेल्या टेक फेस्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. टेक फेस्टमध्ये गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली.
मृतांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. मृताची ओळख अद्याप समोर आलेली नाही. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 2000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यापीठात तीन दिवसीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले असून आज त्याचा शेवटचा दिवस होता. गायिका निकिता गांधी/ध्वनी भानुशाली कार्यक्रम करत असताना हा अपघात झाला.
अपघाताबाबत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, जखमींच्या उपचारासाठी कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान पाऊस पडला. त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी अचानक स्टेजसमोरील बाजूकडे धाव घेतली. त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
दोन जणांची प्रकृती गंभीर
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उन्मेश यांनी सांगितले की, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्क केले असून, मृतांची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील खुल्या सभागृहात चेंगराचेंगरी झाली. कार्यक्रमाला इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.