नवी दिल्ली – न्यूझीलंडमधील स्थानिक न्यायालयाने ३ खलिस्तान समर्थकांना हत्येच्या कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. लोकप्रिय किवी रेडिओवरील निवेदक हरनेक सिंगच्या हत्येचा कट केल्याबद्दल या तिघांना दोषी ठरवण्यात आले आहे. खलिस्तानी चळवळीच्या विचारधारेवर सातत्याने टीका केल्यामुळे त्यांच्या हत्येचा कट खलिस्तानवाद्यांनी केला होता, असे न्यूझीलंडमधील वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी म्हटले आहे.
हरनेक सिंग यांच्यावर २३ डिसेंबर २०२० रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. खलिस्तानवाद्यांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात हरनेक सिंग यांच्यावर तब्बल ४० वार झाले होते. त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी कारचे हॉर्न जोरजोराने वाजवले आणि मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलावले होते. उपचारादरम्यान त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या आणि ३५० टाके घालावे लागले होते.
हा हल्ला म्हणजे धर्मांधता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कट्टरवाद्यांकडून अधिक हिंसाचार होऊ नये यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
या हत्येच्या कटाच्या सूत्रधाराला साडे १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.एका अन्य आरोपीला साडे ९ वर्षांची तर तिसऱ्याला ६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य दोघांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले आहे.