- 19 जणांचा मृत्यू
- 273 जणांना ‘ डिस्चार्ज ‘
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. आज शहरात नवीन 270 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 273 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच 19 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, रविवारी (दि. 6) शहरात 270 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 52 हजार 237 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 19 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 12 व शहराबाहेरील 7 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6 हजार 238 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 273 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 45 हजार 82 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5 हजार 80 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1 हजार 947 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 45 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 992 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात घटली करोनाबाधितांची संख्या
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे चित्र समोर येत आहे. रुग्णालयात रविवारी (दि. 6) केवळ 3 बाधित रुग्ण आढळले. तर एक महिला रुग्ण बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. बाधित रुग्णांमध्ये 2 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा समावेश आहे. अंबड (ता. वेल्हा) येथील 62 वर्षीय महिला रुग्ण करोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात सध्या 21 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आतापर्यंत एकूण 1 हजार 358 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 355 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 2 हजार 60 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. 349 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.