पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेची मिळकतकराची बिले मिळण्याआधीच पुणेकरांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा कर भरण्यास सुरूवात केली असून अवघ्या चार दिवसांतच महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २७ कोटी ३१ लाख रूपयांचा कर जमा केला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून शहरात सुमारे सात लाख मिळकतधारकांंना पोस्टाद्वारे बीले पाठविली असून १५ एप्रिलपर्यंत उर्वरीत बिले पाठविण्यात येणार आहेत तसेच नागरिकांना ई-मेल आणि मोबाईल मेसेजद्वारेही बिले पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे, नागरिकांकडून लेखी बिलाची वाट न पाहता मिळकतकराची बिले भरण्यास प्राधान्य दिले जात असल्याने महापालिकेस मोठा दिलासा मिळाला आहे.
५ ते १० टक्के सवलत
महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकराची बिले ३१ मे पूर्वी भरलेल्या मिळकतधारकांना सर्वसाधरणकरात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे, जास्तीत जास्त पुणेकर ३१ मे पूर्वी कर भरण्यास प्राधान्य देतात.
त्यानंतर महापालिकेकडून मिळकतकरावर प्रत्येक महिन्याला सुमारे २ टक्के दंड आकारण्यात येतो. या शिवाय, महापालिकेकडून मागील वर्षांपासून मिळकतकर वेळत भरणाऱ्या पुणेकरांसाठी लाॅटरी योजनाही सरू केली आहे. ३१ मे पूर्वी कर भरणारे नागरीकच या योजनेत पात्र ठरतात. तसेच, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकातही या योजनेसाठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मागील वर्षी उत्पन्नाला फटका
मागील वर्षी ऐन आर्थिक वर्ष सुरू होताना शहरातील निवासी मिळकतींच्या ४० टक्के सवलतीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे प्रलंबित होता. त्यामुळे, महापालिकेस नागरिकांंना १५ मे नंतर बिले पाठविण्यास सुरूवात झाली, त्यानंतर प्रत्यक्षात महापालिकेस मिळकतकर मिळण्यास सुरूवात झाली.
मात्र, त्यानंतरही काही पुणेकरांनी दि. १ एप्रिल पासूनच कर भरण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे दि. १ एप्रिल ते दि. ४ एप्रिल या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत अवघा ६९ लाख ७५ हजार रूपयांचा महसूल जमा झाला होता.