नागपुर – नागपुर येथील इकॉनॉमिक एक्स्पलोझिव्ह लि या खासगी कंपनीने तयार केलेले एक लाख हातबॉंम्ब संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत आज लष्कराकडे सुपुर्त करण्यात आले. खासगी कंपनीकडून लष्करासाठी दारूगोळा बनवण्यात आल्याचे हे पहिले उदाहरण आहे.
या कंपनीकडून आधुनिक स्वरूपाचे जे हातबॉंम्ब तयार करण्यात आले आहेत त्याची लष्कराकडूनच चाचणी घेण्यात आली आहे. ते त्या चाचणीत खरे उतरले आहेत. त्यानंतरच हातबॉम्बचा हा पहिला हप्ता लष्कराकडे सुपुर्त करण्यात आला आहे.
प्रतिकात्मक स्वरूपात लष्कराकडे हे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी लष्कर प्रमुख नरवणे यांच्यासह लष्कराचे वरीष्ट अधिकारी येथे उपस्थित होते. हे हातबॉम्ब लष्कराला पुरवण्याच्या बाबत 1 ऑक्टोबर 2020 मध्ये करार झाला होता.
या कंपनीला एकूण दहा लाख हातबॉम्ब तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. लष्कर आणि हवाईदलासाठी याचा वापर केला जाणार आहे. येत्या दोन वर्षात ही सारी दहा लाख हातबॉम्बची ही ऑर्डर पुर्ण केली जाणार आहे.
सध्या लष्करात दुसऱ्या महायुद्धात ज्या पद्धतीचे बॉम्ब वापरण्यात येत होते त्याचाच वापर होत होता. डीआरडीओने दिलेल्या निकषानुसारच हे आधुनिक हातबॉम्ब तयार करण्यात आले आहेत. ते वापरायला सोपे आणि परिणामकारक आहे असा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला आहे.