नवी दिल्ली – अर्थकारणाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्वपुर्ण घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1.1 लाख कोटी रूपयांच्या कर्ज हमीची घोषणा केली आहे.
तसेच त्यांनी लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी तातडीच्या पत पुरवठा हमी योजनेत दीड लाख कोटी रूपयांची मर्यादा वाढवली आहे. आता या योजनेत या क्षेत्रातील उद्योगांना साडेचार लाख कोटी रूपयांचे वित्त सहाय्य मिळू शकणार आहे.
गेल्यावेळी जे 20 लाख कोटी रूपयांचे पॅकेज केंद्र सरकारने जाहीर केले होते, त्यात लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांच्या कर्ज पुरवठ्यासाठी साडे तीन लाख कोटी रूपयांचे बॅंक कर्ज पुरवण्याची घोषणा केली होती. त्यात ही दीड लाख कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
या कर्जातून ऑक्सिजन निर्मीतीचा प्लांट टाकणे, हॉस्पिटल्सची उभारणी करणे अशा कामांसाठीही कर्ज मिळू शकणार आहे. ही कर्ज योजना 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार होती ती आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पत हमी योजनेत दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जाला केंद्र सरकार शंभर टक्के हमी देणार आहे. त्यातून रूग्णालये, नर्सिंग होम, क्लिनीक्स, मेडिकल कॉलेज, ऑक्सिजन प्लॅंट उभारणी अशी कामे करता येणार आहेत. या सर्व कर्जांवर साडे सात टक्के दराने व्याज आकारणी केली जाणार आहे.