मुंबई – आपण ओबीसी समाजाचे असल्याने आपल्याला महसुल खाते मिळू शकले नाही असे विधान राज्यातील कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना संयम पाळण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांनी धीर धरला तर त्यांना याही पेक्षा मोठी जबाबदारी मिळू शकते असे थोरात यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार यांच्याकडेसध्या मदत, पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन आणि बहुजन कल्याण ही खाती आहेत.
लोणावळा येथील ओबीसी परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी वरील विधान केले होते. ते म्हणाले की मागच्या विधानसभेत आपण विरोधी पक्ष नेते होतो. त्यामुळे या मंत्रिमंडळात आपल्याला मोठे खाते मिळेल असे वाटले होते पण आपण ओबीसी असल्यामुळेच आपल्यावर हा अन्याय झाला आहे असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
त्यावर बोलताना थोरात म्हणाले की बहुधा त्यांना काही वेगळेच म्हणायचे असावे पण त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला असू शकतो. त्यांना भविष्यात याही पेक्षा मोठी जबाबदारी मिळू शकते असेही थोरात यांनी नमूद केले.