- नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यूथ फाऊंडेशनचा उपक्रम
पिंपरी – रावेत उपनगरात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि विविध साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब लक्षात घेता नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यूथ फाऊंडेशनच्या वतीने रावेत प्रभागात स्वखर्चातून स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
करोनाच्या वाढता प्रादुर्भाव असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय विभागाकडून करोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. महापालिकेकडे शहरातील स्वच्छतेसाठी गवत काढण्यासाठी स्वयंचलित यंत्र असले तरी संपूर्ण शहराच्या दृष्टीने ही यंत्रे कमी पडत आहेत. त्यामुळे रावेत प्रभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्वखर्चाने जेसीबी आणि मजुरांच्या साह्याने परिसरातील खुल्या जागांवरील, रस्ता दुभाजक या ठिकाणी वाढलेले गवत काढून प्रभागाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. रावेत प्राधिकरणातील सेक्टर 29 व 32 तसेच मुख्य रस्त्यावर असणारे रस्ता दुभाजक आणि अंतर्गत रस्स्यावर असणाऱ्या खुल्या जागेपासून या कामाला मागील तीन चार दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे.
या स्वच्छता मोहिमेत स्वतः मोरेश्वर भोंडवे थांबून जातीने लक्ष घालत आहेत. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या धर्तीवर नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्याकडून रावेत प्रभागातील विविध सोसायटी आणि लोकवस्तीचा आढावा घेण्यात येत आहे. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे स्वतः दररोज प्रभागात फिरून परिसरातील स्वच्छता आणि करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करीत आहेत. तसेच नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्यादेखील वैयक्तिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पहिल्या टप्प्यात प्रभागातील खुल्या जागांवरील गवत काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागातील रस्त्यांच्या कडेला असलेले गवत काढण्यात येणार आहे. रावेत परिसरात खुल्या जागा सर्वाधिक असून, यातील बऱ्याच जागा महापालिकेच्या आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या मालकीच्या आहेत. या जागांवर गवतांचे साम्राज्य तयार झाले आहे तर अनेक ठिकाणी कचरा कुंड्यांचे स्वरूप येऊन परिसरात अस्वच्छता वाढली आहे. याकडे महापालिका लक्ष देत नसल्याने हे गवत काढायचे कोणी असा प्रश्न निर्माण झालेला होता.
करोना विषाणू विरोधात सुरू असलेली लढाई सोपी नसून एकट्या पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर त्याचा भार न टाकता लोकप्रतिनिधी या नात्याने कर्तव्य म्हणून आम्ही स्वतः स्वखर्चाने प्रभागात स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. रावेत हा माझा प्रभाग असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील माझीच आहे.
मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस