बेल्हे – समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता. जुन्नर) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिव्हल निमित्त नुकताच एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. समर्थ संकुलात दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान ठेवत वैविध्यपूर्ण व समाजाला संदेश देणारे देखावे सादर केले जातात. यावर्षी करोनाची दाहकता लक्षात घेता साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ऑनलाइन गणेश फेस्टिव्हल साजरा होत आहे.
न्यू इंग्लिश स्कूल पारनेरचे कला शिक्षक -चित्रकार ज्ञानेश्वर कवडे यांच्या हातून साकारलेली एक स्तुत्य कल्पना म्हणजे अक्षर गणेश या उपक्रमांतर्गत विविध नावांतून, अक्षरांतून गणेशाचे सुंदर, मनमोहक निरनिराळ्या आकाराचे चित्र काही मिनिटांत रेखाटन करणे यात कवडे यांचा हातखंडाच आहे. ही कला जोपासत गणरायाची आराधना करण्याचा त्यांचा मानस आहे. आज समर्थ संकुलात कवडे सरांच्या चित्र शैलीतून समर्थ या नावाची गणरायाची अत्यंत रेखीव, सुंदर, निर्विकार अशी प्रतिमा कागदावर साकार झाली. त्यानंतर तंत्रशिक्षण तसेच अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री च्या गणपतींची देखील चित्र रूपाने मानस पूजा करण्यात आली.
कलेमध्ये जीवनाच्या यशाचा मंत्र दडलेला असून आनंदी, उत्साही आणि स्फूर्तिदायक जीवन जगण्यासाठी सुखी जीवनाचे तंत्र, कला हाच मंत्र असे कला शिक्षक ज्ञानेश्वर कवडे म्हणाले.