प्रशांत जाधव
सातारा – शहरातील तसेच जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नेमणूक केलेल्या शहर व जिल्हा वाहतूक पोलिसांकडून सर्वसामान्यांची लुट केली जात आहे. धनदांडग्यांना अभय देत, सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवत सातारा शहरात वाहतूक पोलिसांचे टोलनाके जोमात सुरू असल्याचे वास्तव आहे. त्याच त्या ठिकाणी नेमले जाणारे तेच ते चेहरे पाहिले की, शहर वाहतूक पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे. महामार्गावर तसेच सातारा शहरात वाहनधारकांना अडवून लुटणारे वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी म्हणजे “चालते बोलते’ टोलनाके झाले असून हे टोलनाके हटावण्यासाठी एसपींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
महामार्गावरील तसेच सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहनचालकांना मार्गदर्शन करणे, क्षमतेपेक्षा अधिक किंवा विना परवाना मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे,
अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, नाकाबंदीची कर्तव्ये बजावणे, अपघातस्थळी वाहनधारकांना मदत करणे, ही कामे हायवेवरील तसेच शहरातील वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित असताना केवळ वाहने अडवून, सक्तीने पैसे वसूल करण्याचा उद्योग राजरोस सुरू असल्याचे दिसते. सातारा शहरात पोवई नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, चाहूर फाटा येथील सेवा रस्ता, वाढेफाटा, कास रोड, बोगदा, देगाव फाटा, जिल्हा परिषद चौक, बसस्थानक पसिसर, गोडोली नाका या परिसरात वाहतूक पोलिसांची टोळकी सावजाच्या शोधात आढळून येतात. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमन करून कारवाई करणे अथवा पैसे उकळणे याला कोणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. मात्र, ज्या मूळ कामासाठी नेमले ते काम बाजूला ठेवून केवळ सावज हेरण्यात वेळ घालवण्यात कसली आलीयं धन्यता, असा सवाल संतप्त वाहनधारक विचारत आहेत.
त्यांचे ड्युटी बटवडे तपासा
शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी कर्तव्य करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे चेहरे पाहिले तर तेच ते चेहरे दिसून येत आहेत. वाहतूक शाखेत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार ड्युटी देणे अपेक्षित असताना ठराविक चेहऱ्यांना नेमण्यात कोणते अर्थकारण तरी नाही ना? याची पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच काही चेहरे पाहिले तर वाहतूक शाखा केवळ यांच्यासाठीच निर्माण झाली की काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण हे चेहरे फिरून फिरून पुन्हा वाहतूक शाखेलाच काम करताना दिसून येत आहेत.
पोलीस अधिकारी तरी सोडा
जिल्ह्यात काम करणारे एक पोलीस अधिकारी खासगी वाहनाने काही दिवसांपूर्वी साताऱ्यात आले होते. पोवई नाक्यावर त्यांची गाडी अडवून वाहतूक पोलिसांनी त्यांना कागदपत्रांची मागणी केली. पोलिसांचा मुड लक्षात आल्याने त्या अधिकाऱ्याने आपली ओळख न सांगता त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतर पीयूसी व सीटबेल्ट न लावल्याचे सांगून दंड भरण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यावर त्या अधिकाऱ्याने “”साहेब, काहीतरी मार्ग काढा” अशी विनंती केल्यावर थेट पाचशे रूपये मागण्यात आले. त्यानंतर भडकलेल्या संबधित अधिकाऱ्याने त्यांचे ओळखपत्र दाखवून त्या पोलिसांची चांगलीच झाडाझडती केली होती. भर चौकात आपला पानउतारा झाल्यानंतर त्या पोलिसांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
=================