डॉक़्टर आणि वैद्यकीय पथकही पाठविणार
पुणे : सांगली आणि कोल्हापूर मधील पूरस्तांसाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 2 ट्रक मदत रवाना करण्यात आले. त्यात प्रामुख्याने खाद्यपदार्थ आणि 20 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या टिळक रस्ता येथील पक्ष कार्यालयातून शनिवारी सकाळी ही मदत रवाना करण्यात आली. या मदतीसह राष्ट्रवादी कॉंग्रसचे कार्यकर्तेही पूरग्रस्तांना मदत वाटप तसेच इतर मदतीच्या कामांसाठी सांगली आणि कोल्हापूरकडे गेले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यानंतर शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी तातडीनं सर्व आघाडयांच्या बैठका घेत आवश्यक असलेली मदत संकलीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, कार्यकर्त्यांनी,खाकरे बिस्किट,े फरसाण, चिवडा, भेळ, राजगिरा लाडू गुडदानी, शेगदना चिक्की, चहा पावडर, साखर दूध पावडर, तसेच साबण टूथपेस्ट अशा गरजेच्या वस्तू पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविल्या आहेत. या शिवाय, या भागात पुरामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने सुमारे 20 हजार पाण्याच्या बाटल्याही या मदतीत पाठविण्यात आल्या असल्याचे तुपे यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांकडून पूरग्रस्तांना मदत देताना, गहू, ज्वारी, बाजरी असे साहित्य न पाठविता या भागात हे धान्य दळण्यासाठी वीज पुरवठा नसल्याने तयार पिठे पाठविण्यात यावीत असे आवाहन केले आहे.
वैद्यकीय पथकही पाठविणार
दरम्यान, पक्षाकडून सोमवारी या भागासाठी डॉक्टर, औषधे तसेच ऍम्ब्युलन्सही पाठविण्यात येणार आहे. या भागातील पूरस्थिती ओसरल्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था धोक्यात येऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे.त्यामुऴे पक्षाकडून ही मदतही केली जाणार असून या नागरिकांना चादरी तसेच ब्लॅंकेट पाठविण्यात येणार असल्याचेही ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.