चिंबळी – मोई ते निघोजे (ता. खेड) रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याने पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील असलेल्या चिखली-तळवडे गावाकडे जाणाचा हा मार्ग जवळचा असल्याने मोई, निघोजे रस्त्यावर सतत नागरिकांसह जड मालवाहू वाहनांची वर्दळ असते. त्यातच गेल्या 15 दिवसांपासून संततधार तर मध्येचे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर प्रशासनाला नागरिकांची दया आली आणि त्यांनी महिन्याभरापूर्वी रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली मात्र, त्यातच पाऊस सुरू झाल्याने रस्त्याचे काम बंद केले असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून त्यातून एखादे वाहन त्यातील पाणी पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने पादचाऱ्यांची कुंचबणा होत आहे. तरी पाऊस थांबेपर्यंत रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवावेत अशी मागणी जोर धरीत आहे.